कोरोनाच्या नावाखाली बीड जिल्ह्यात तब्बल 59 कोटीचा खर्च:डॉक्टरांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार
बीड-कोरोनाच्या नावाखाली बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडून अव्वाच्या सव्वा बिल लावून कोट्यावधी रुपये शासनाकडून उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली आहे. महामारीच्या संकटासोबत संपूर्ण देश लढा देत असताना काही अधिकाऱ्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप डॉ गणेश ढवळे यांनी केला आहे. यासंबंधीचे कागदपत्रदेखील त्यांनी माध्यमांसमोर सादर केली आहेत. बीड आरोग्य यंत्रणेकडून रुग्णालयातील अद्यायावत इमारतीची दुरुस्ती आणि विद्युतीकरण यावर कोट्यवधीचा खर्च केल्याचं समोर आला आहे
केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटर, रेमडीसिव्हर आणि उपकरणे दिली गेली तसंच मनुष्यबळाचा खर्च राज्य शासनाच्या तिजोरीतून केला गेला. औषधांसाठीदेखील राज्य शासनानं मदत केली, मात्र तरीदेखील जिल्ह्यात 59 कोटी रुपये खर्च झाले कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर शासनाकडे हस्तांतरित न केलेल्या इमारतीची दुरुस्ती करण्यावरदेखील उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. तसंच गरज नसताना विद्युतीकरणावर सात ते आठ कोटी रुपये खर्च केला आहे. हे फक्त सत्ताधारी पक्षातील गुत्तेदार यांचे संबंध जपण्यासाठीच केलं केल्याचा आरोपदेखील डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.