राजकारण

पंतप्रधान मोदी हे भगवान शंकराचा अवतार असल्याने त्यांनीच देशाला करोनापासून वाचवलं

हिमाचल प्रदेशमधील शहरविकास मंत्री असणाऱ्या सुरेश भारद्वाज यांनी शिमला येथील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे म्हटले आहे. २०१९ मध्ये जेव्हा निवडणुकीचे निकाल आले त्यापूर्वी मोदींनी दोन दिवस केदारनाथ येथील गुहेमध्ये ध्यान केलं होतं. मोदींना भगवान शंकराचे वरदान मिळालं आहे. पुढे बोलताना भारद्वाज यांनी करोनाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी या साथीच्या संकटाला तोंड दिलं आहे ते पाहता त्यांच्याकडे आता जागतिक स्तरावरील नेता म्हणून पाहिलं जाऊ लागलं असल्याचंही सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाआधी दोन दिवस केदारनाथमध्ये घालवले. या काळात ते गुहेमध्ये ध्यान करत होते. त्यानंतर निवडणुकीत मोठा विजय मिळाला याचं आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी स्मरण केलं पाहिजे, असंही भारद्वाज म्हणाले. “मोदींना भगवान शंकराचा आशिर्वाद मिळाला आहे. मोदी हे भगवान शंकाराचे रुप आहे. त्यामुळेच त्यांनी देशाला करोनासारख्या संकटापासून वाचवलं,” असंही भारद्वाज यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

पुढे बोलताना भारद्वाज यांनी जगभरामध्ये करोनाची लस बनवणाऱ्या सर्व देशांमध्ये भारताने आघाडी घेतली असल्याचं सांगितलं. भारत हा एकमेव असा देश आहे ज्याने दोन लसी निर्माण केल्या आहेत. आता जगभरातील इतर देश भारताप्रमाणे दोन लसी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून भारताकडून लसीसंदर्भात मदत मागत आहेत, असंही भारद्वाज यांनी म्हटलं आहे. लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर मोदींची प्रतिमा अधिक मोठी झालीय. त्यामुळेच ते शिवाचा अवतार आहेत, असा दावाही भारद्वाज यांनी केलाय. इतकचं नाही तर मोदींनी करोनापासून देशाला वाचवलं हे सांगताना भारतामध्ये करोना मृत्यूदर कमी असण्यासाचे श्रेयही भारद्वाज यांनी मोदींनाच दिलं आहे.

हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय शिवरात्री मोहोत्सव सुरु होत आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्या हस्ते या मोहोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळा सात दिवस सुरु राहणार असून यामध्ये अनेक पंजाबी आणि स्थानिक कलाकार सहभागी होणार आहेत.