जिल्हयातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद:इयत्ता 5 वी ते 9 वी व 11 वी़ वर्गाचा समावेश- जिल्हाधिकारी
बीड,दि.10
जिल्हयातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता 5 वी ते इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी चे वर्ग तात्पुरत्या स्वरुपात 31 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.
या कालावधी दरम्यान बंद कालावधीत इयत्ता 5 वी ते 9 वी व 11 च्या वर्गांना शिकवणारे शिक्षक ऑनलाईन साधनांचा वापर करुन अध्यापनाचे कामकाज सुरु ठेवतील. यापूर्वीच्या आदेशान्वये जिल्हयात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याकरिता कोव्हिड संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व माध्यमे व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेतील इयत्ता 5 वी ते इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी चे वर्ग 10 मार्च 2021 पर्यंत बंद करण्यात आले होते.
जिल्ह्यातील काही शाळामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कोव्हीड पॉझीटीव्ह आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोव्हीड पॉझीटीव्ह रुग्णांची जिल्ह्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन आदेशास मुदतवाढ देणे आवश्यक वाटत असल्याने हे निर्देश दिले आहेत.
वरील आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड- 19 ) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दि. 13-3-2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड -19 नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या लागू करण्यासाठी सक्षमता प्राधिकारी घोषित करण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूचे (कोविड-19) उद्भवणा-या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियत्रंण यासाठी महाराष्ट्र कोविड-19, उपाययोजना नियम 2020 यातील नियम 3 नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केलेले आहे आणि त्यांना कार्यक्षेत्रातील कोविड -19 वर नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील.