महाराष्ट्रमुंबई

आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदे येत्या 2 महिन्यात भरणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागातील अ, ब, क आणि ड विभागातील 18 हजार 397 पदे रिक्त आहेत. जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही, असे सांगताना राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदे येत्या 2 महिन्यात भरण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले.

‘ड’ संवर्गातील सर्वच्या सर्व पदे थेट भरतीच्या माध्यमातून भरली जाणार असून ‘क’ संवर्गातील 50 टक्के पदे भरली जाणार आहेत. तर मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर उर्वरित पदे भरली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोना काळात आरोग्य सेवा देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता.

यावर उत्तर देताना टोपे म्हणाले की, कोरोना काळात सेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागात 26 हजार 486 कंत्राटी पदे भरली होती. या कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन आरोग्य सेवा दिली. त्यांच्या सेवेबद्दल सरकार कृतज्ञ आहे. मात्र त्यांना थेट कायमस्वरुपी नियुक्ती देणे नियमानुसार शक्य नाही. मात्र अनुभवाच्या अनुषंगाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.

अ’ आणि ‘ब’ संवर्गातील पदे भरण्यासाठी कायदेशीर अडथळे आहेत. त्यासाठी एक महिन्याच्या आत मुख्य सचिवांशी चर्चा करुन त्यातील अडचणी सोडवल्या जातील, असे आश्वासनही राजेश टोपे यांनी दिले.