बीड

जिल्ह्यातील सर्व दुकानदार, व्यापारी व व्यावसायिकांची अँटिजेंन टेस्ट होणार-जिल्हाधिकारी

बीड, दि. १::–कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या जास्त संपर्कात येणाऱ्या भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, दूध विक्रेते यासह इतर व्यावसायिक व सुपर स्प्रेंडर्सच्या अँटिजन तपासणीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या अनुषंगाने जिल्ह्यातील दुकानदार , व्यापारी व व्यावसायिकांनी अँटिजेंन टेस्ट करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना शासनाने कोरोना लस द्यावी, असे मागणीचे निवेदन व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. जगताप यांना दिले. याप्रसंगी झालेल्या बैठकीत व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी अँंटिजन तपासणी मोहिमेसाठी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले आहे त्यामुळे कोरोना चाचण्याच्या अँटिजन तपासणीस दुकानदार व व्यापारी यांचा विरोध नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील विविध व्यवसायिक आणि दुकानदार संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अति पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सूर्यकांत गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधाकीसन पवार,महसूल विभागाचे अधिकारी आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप म्हणाले कोरोना बाबत जिल्ह्यातील नागरिकात सतर्कता वाढणे साठी प्रशासनाने आखलेल्या उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात दुकानदार, व्यावसायिक, जनतेच्या जास्त संपर्कात असलेले सुपर स्प्रेडर यांनी तालुका प्रशासनाच्या नियोजनानुसार कोरोना तपासणी करून दुकाने व्यवसाय सुरू करावेत.यासाठी कोरोना तपासणीची मोहीम राबवावी. मंगल कार्यालये, सभागृहे, क्लासेस, गर्दी होणारी बस, वाहने आदी ठिकाणी नियम भंग होत असेल तर कारवाई केली जावी. यादृष्टीने तालुका स्तरावरील यंत्रणेने सक्षम पणे कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी जगताप यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे . या अंतर्गत व्यावसायिक व दुकानदार यांचे तपासणी करून नंतरच त्यांना दुकान सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यातील विविध शहरात ऑंटीजन तपासणी मोहीम सुरुवात करण्यात येणार आहे.