सावधान:बनावट फास्टॅगचा सुळसुळाट;वाहनचालकांना अनावश्य भुर्दंड
बाजारात बनावट फास्टॅगची विक्री जोरात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोलनाक्याच्या परिसरात तसेच ऑनलाइन माध्यमातून बिनदिक्कन फास्टॅगच्या नावाखाली बनावट विक्री सुरू असल्याचे समोर येत आहे.
‘टोलझोल’ रोखण्यासाठी टोलनाक्यांवर फास्टॅगची सक्ती करण्यात आली आहे. मात्र बाजारात बनावट फास्टॅगची विक्री जोरात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोलनाक्याच्या परिसरात तसेच ऑनलाइन माध्यमातून बिनदिक्कन फास्टॅगच्या नावाखाली बनावट विक्री सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वाहनचालकांची फसवणूक होत असून त्यांना अनावश्यक भुर्दंड पडत आहे. या पार्श्वभूमीवर, वाहनांसाठी फास्टॅग खरेदी करताना, अधिकृत विक्रेते किंवा बँकर यांच्याकडूनच फास्टॅग विकत घ्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केले आहे.
देशात फास्टॅग अनिवार्य असले, तरी मुंबईच्या प्रवेशद्वारावर रोख रकमेचा पर्याय वाहनधारकांना उपलब्ध आहे. मुंबईचे टोलनाके फास्टॅग यंत्रणेसाठी सक्षम आहेत. मात्र कंत्राटदारांच्या तांत्रिक अडचणींमुळे सर्वच मार्गिकांवर ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. परिणामी, टोलनाक्यांवर वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी फास्टॅग आणि रोख रक्कम असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत.
फास्टॅग सक्तीच्या पार्श्वभूमीवर बनावट फास्टॅगही बाजारात आणण्यात आले आहेत. टोलनाक्यांच्या सुमारे १००-१५० मीटरच्या परिसरात ‘येथे फास्टॅग मिळेल’ अशा पाटी हमखास नजरेस पडते. नामांकित कंपन्यांच्या नावाची मोठी छत्री, टेबल-खुर्ची मांडून तिथे राजरोस व्यवहार सुरू आहेत. त्याशिवाय, ऑनलाइन माध्यमातूनही बनावट फास्टॅग काढले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. बनावट फास्टॅगमुळे स्कॅन न होणे, पैसे वजा न होणे असे प्रकार घडतात. फास्टॅगच्या रांगेत असल्याने वाहनचालकांना डबल टोल भरावा लागतो. फास्टॅगसाठी आधीच पैसे मोजलेले असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेकदा यामुळे टोलनाक्यावर वादाचे प्रसंगही घडतात.
महामार्ग प्राधिकरणाचा इशारा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर बनावट फास्टॅगबाबत इशारा देण्यात आला आहे. ‘वैध ऑनलाइन फास्टॅग घेण्यासाठी www.ihmcl.co.in या संकेतस्थळावर किंवा MyFAStag app येथे संपर्क साधावा. याचबरोबर अधिकृत बँका, बँकेच्या संकेतस्थळावरून किंवा अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावेत. याची यादी ihmcl च्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे, असे या इशाऱ्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवासादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी बनावट फास्टॅग खरेदी करू नका. अधिक माहितीसाठी प्राधिकरणाचा हेल्पलाइन क्रमांक १०३३ यावर किंवा etc.nodal@ihmcl.com येथे संपर्क साधा, अशी सूचना प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळावर केली आहे.