राज्यातल्या 9 जिल्ह्यात कडक निर्बंध:काही जिल्ह्यात 10 दिवसाचा लॉकडाऊन
विदर्भात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे.
जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे, याबाबत विश्लेषण करून डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा. सोबतच खाजगी रुग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याची कारणे याबाबत ऑडीट रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. याचाच भाग म्हणून अकोला, वर्धा, औरंगाबाद, नांदेड, बुलडाणा, वाशिम, भिवंडी, अमरावती आणि सांगली या जिल्हात प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या पाहता, पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ अकोला, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा या कालावधीत सुरू राहतील. या दोन्ही ठिकाणी कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीत दर रविवारी जिल्हा बंद ठेवण्यात येईल. यादिवशी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. येत्या रविवारपासून अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. अमरावतीमध्ये दर आठवड्यात शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासूनच शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
धार्मिक समारंभासाठी केवळ ५ व्यक्तींची परवानगी असेल. तर कोरोनाशी संबंधीत नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर कठोर निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक आठवड्यात शनिवारी ते सोमवार असा लॉकडाऊन लागू असेल असे यावेळी जिल्ह्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जलतरण तलाव, इनडोअर गेम्स यासारख्या गोष्टींवर पुर्णपणे बंदी असेल. तर धार्मिक समारंभावरही यामुळे मर्यादा आलेल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून अमरावतीत कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यानच्या कालावधीत १४ फेब्रुवारीला ४३५ रूग्ण सापडले आहेत. यादरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी कोरोना रूग्णांची संख्या पाहता लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल असा इशारा दिला होता. त्यानुसारच जिल्हा प्रशासनाने पावले उचलत या एका दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये लॉकडाऊन करण्याचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांना याआधीच देण्यात आले होते. या तिन्ही परिसरात तीन ते चार महिन्यानंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. त्यामुळेच या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे.