मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक:कडक नियम लागू करा-केंद्रेकर
औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. राज्य सरकारने देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. या दरम्यान, औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे एक ऑडिओ संभाषण व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकणार असल्याने सावध राहण्याच्या सूचना मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. सर्दी, ताप असलेले नागरिक फिरताना दिसल्यास गुन्हे दाखल करा असे आदेश सुनिल केंद्रेकरांनी दिलेत.
ते म्हणाले, विना मास्क फिरल्यास दंड केला जाईल, अशी माध्यमातून सुचना करा. काही ठिकाणी पेशंट आणि सर्दी पडसे किंवा फ्लू टाइप लक्षणे असलेली लोक फिरली विदाऊट प्रोटेक्शन तर त्यांच्यावर इपिडेमिक अॅक्ट खाली स्प्रेड केलं म्हणून गुन्हे दाखल होतील.
तुम्ही तुमचा एसपी, सीईओ आणि अतिरिक्त पालिका आयुक्त अशा तिघांनी मिळून कृपा करून मोठ्या प्रमाणावर पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना वॉर्निंग द्या.
नियम पाळले नाही तर मास्कचे दंड मोठ्या प्रमाणावर चालू राहिल असे स्पष्ट करा. लोकांना वॉर्निंग द्या की ही परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन कडक स्वरुपाचा लावावा लागेल. तसेच लोकांना स्वत:हून बाहेर यायला सांगा. लोक बाहेर आले आणि ते अर्ली पेशंट असेल तर प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर होम आयसोलेशनचा विचार करू अन्यथा कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन होईल. इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्येच उपचार होईल हे लक्षात घ्या, असे लोकांना सांगा’, असे आदेशही त्यांनी दिले.
मला लातूर, बीड आणि नांदेडची काळजी आहे. परभणीच्या सिव्हिलची टेस्टिंग वगैरे फार बोगस आहे. मी त्यावर बिलकूल समाधानी नाही. हिंगोलीचं टेस्टिंग तर अत्यंत पुअर आहे. तुम्ही त्याकडे लक्ष द्या. ट्रेसिंगकडे लक्ष द्या. त्याच त्या सूचना बोलायला लावू नका. सीईओनी यात पुढे आलं पाहिजे. यात मी म्युनिसिपल कमिशनरलाही जबाबदार धरणार आहे. बी अलर्ट मिशनरी आता पुन्हा टोनिंग करा आणि तुमचा रिस्पॉन्स टोनअप करा. पुन्हा या विषयावर वेगळी व्हिसी घेण्याची माझ्यावर वेळ आणू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या अनुषंगानेही काही सूचना केल्या आहेत. ‘खासगी डॉक्टरांकडे रुग्ण जात आहेत. सर्दी खोकला, ताप आणि फ्लू टाइप लक्षणे घेऊन हे रुग्ण जात आहेत आणि खासगी डॉक्टर त्यांना टेस्ट सजेट करत नाहीत. सर्व डॉक्टरांना लिखित स्वरुपात सुचना द्या की, कोणत्याही रुग्णाला फ्लू टाइप लक्षणे असल्यास किंवा कोविड टाईप लक्षणं असल्यास टेस्ट करण्यास अनिवार्य असेल. साधा ताप आहे म्हणून रुग्णाला घरी पाठवणे चुकीचे होईल. पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तो आयसोलेट झाला पाहिजे, अशी डॉक्टरांना वॉर्निंग द्या’, असे आदेशच त्यांनी दिलेत.