पिकांना एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत कायम राहील- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पिकांना एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत कायम राहील, अशी खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत बोलताना दिली. नव्या कृषी कायद्यांमुळे पिकांना हमी भाव मिळणार कि, नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात साशंकता असताना पंतप्रधान मोदींनी हमी भाव कायम राहील, असे आश्वासन संसदेत दिले. कृषी कायद्यावरुन निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी त्यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलताना मोदी म्हणाले की, “एमएसपी होता, एमएसपी आहे आणि भविष्यातही एमएसपी कायम राहिलं.गरीबांना परवडणाऱ्या दरात धान्य उपलब्ध करुन दिले जाईल. मंडींचे आधुनिकीकरण केले जाईल” असे मोदींनी सांगितले.
आपले कृषीमंत्री शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत बोलत आहेत. चिंतेची स्थिती नाही. या सभागृहाच्या माध्यमातून मी पुन्हा त्यांना चर्चेसाठी निमंत्रित करतो. पण मुद्दा सोडवण्यासाठी पाऊल पुढे टाकले पाहिजे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कृषी सुधारणांवर विरोधी पक्षाच्या घुमजाववर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काँग्रेस आंदोलनामध्ये सहभागी होत आहे याबद्दल काहीही आक्षेप नसला तरी त्यांनी शेतकऱ्यांनाही मागील अनेक वर्षांपासून असणारी यंत्रणा आता बदलण्याची गरज आहे हे ही सांगणं महत्वाचं होतं, असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं. पुढे बोलताना कृषी धोरणांसंदर्भात यू-टर्न घेणाऱ्यांसाठी आपण मनमोहन सिंग यांचं एक जुनं वक्तव्य वाचून दाखवत असल्याचं सांगत पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला.