जागो सरकार जागोचा नारा देत ब्राम्हण समाजाचे ठाकरे सरकारला स्मरण पत्र
शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्ष केल्या जात असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी बीड येथे गुरुवार दि.21 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर ब्राह्मण समाजाने रस्त्यावर उतरत जागो सरकार जागोचा नारा देत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र देण्यात आले.
ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी, के.जी.टू पी.जी.शिक्षण मोफत देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे, पुरोहित बांधवाना मानधन सुरू करावे, कुळात गेलेल्या जमिनी परत कराव्यात, स्वा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेक आंदोलने निवेदने सरकार दरबारी लाल बसत्यात खितपत पडली आहेत.
ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्यावतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात 1 जानेवारी ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत पळी-ताम्हण वाजवून सरकारला प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी जागो सरकार जागो नारा दिला आहे
त्याचाच भाग म्हणून गुरुवार दि.21 जानेवारी रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक प्रमोद पुसरेकर, नगर सेवक राजेंद्र काळे, गिरीष देशपांडे, प्रशांत सुलाखे, अनिल देवा कुलकर्णी, अ.भा.ब्राह्मण महासंघाचे चंद्रकांत जोशी, बाळासाहेब जोशी, नगर सेवक विजय जोशी, कृष्णा वांगीकर, प्रमोद रामदासी, प्रशांत लहूरीकर, नीतेशकुमार कुलकर्णी, अनिकेत देशपांडे,जी एम कुलकर्णी, जयंत रसाळ, ऍड अक्षय भालेराव, भामचंद्र कुलकर्णी, नंदकुमार रुईकर, ऍड समीर पाटोदकर यांच्या सह समाज बांधवानी रस्त्यावर उतरत जागो सरकार जागो चा नारा देत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले,
या ताम्हण-पळी आंदोलनाचा समारोप 22 जानेवारी 2021 शुक्रवार रोजी औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करून होणार असून औरंगाबाद येथे होणाऱ्या आंदोलनात समाजबांधव, महिला भगिनी, युवक युवतींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक प्रमोद पुसरेकर यांनी केले असून यानंतरही सरकार जागे झाले नाही, समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही, त्यावर तात्काळ योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. आंदोलनास मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपास्थित होते.