10 वी च्या पुस्तकांची विक्री सुरू;पहिली ते आठवीची पुस्तके मोफत मिळणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इ. 1 ली ते इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत 5 कोटी 73 लाख 30 हजार 269 पाठ्यपुस्तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत 3 कोटी 87 लाख 5 हजार पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या वितरणास आज शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. आजपासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात येणार आहे.