महाविद्यालये सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये अद्याप बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि परीक्षा जरी सुरू असल्या तरी प्रत्यक्षात महाविद्यालये केव्हा सुरू होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच सर्व उपाय योजनांची खबरदारी घेऊनच महाविद्यालयाये सुरू करण्याचे विचाराधीन आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याबाबत येत्या २० जानेवारीच्या आत निर्णय घेतला जाईल,असे उदय सामंत यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचा प्रसार काहीसा कमी होताना दिसत आहे.
तसेच देशासह राज्यातही लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील महाविद्यालये कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविद्यालये सुरू करण्याबाबत माहिती दिली. “येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक विद्यापीठात असलेल्या वसतिगृहांची, महाविद्यालयांची परिस्थिती बघून, क्वारंटाईन सेंटरचा आढावा माझ्या विभागाकडून घेतला जाणार आहे. येत्या २० तारखे अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू करता येतील का किंवा त्यासाठी काही नियमावली तयारी करावी याचा विचार केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची सुरक्षितता लक्षात घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय २० तारखेपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
प्राचार्यांची २६० पदे भरणार
राज्यातील प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरती प्रक्रियेविषयी देखील उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार प्राचार्यांची २६० पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यापीठातील ४९ संविधानिक पदे भरण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानंतर प्राध्यापकांची भरती रोखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राचार्य आणि विद्यापीठातील संविधानिक पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात चिंता असणे स्वाभाविक आहे. मात्र या सगळ्याचा विचार करून आणि खबरदारी घेऊनच महाविद्यालये आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय भविष्यात घेण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले. लॉ च्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रिये दरम्यान काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यासाठी लॉ कॉलेजच्या प्रवेशप्रक्रियेची मुदत येत्या सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लॉ कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन उदय सामंत यांनी केले. यासह पॉलिटेक्निक विभागाच्या प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्याची मागणीही केली जात होती. त्यानुसार १५ तारखेपर्यंत पॉलिटेक्निक आणि तंत्र विभागाच्या सगळ्या प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्यात येणार आहे. परंतु १५ तारखेची ही वाढीव मुदत अंतिम असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.