देशनवी दिल्ली

चार राज्यात लसीकरणाची ट्रायल यशस्वी:पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा मार्ग मोकळा

केंद्र सरकारने देशात कोरोना विषाणूविरुद्ध लसीकरणाची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. लस देण्याआधी आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरातमध्ये 28 आणि 29 डिसेंबरला ‘ड्राय रन’ चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामुळे पुढील वर्षी देशभरात विविध ठिकाणी लसीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू होईल असे विधान केले होते. लसीकरणाआधी सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी 4 राज्यांमध्ये ड्राय रन चाचणी घेण्यात आली.

लसीकरणात काही त्रुटी असतील तर त्या दूर करणे, सोबत प्लॅनिंग, इम्प्लिमेन्टेशन किंवा रिपोर्टिंग मेकॅनिजम पाहणे, कोरोना लसीसाठी कोल्ड स्टोअरेज आणि वाहतुकीची व्यवस्था, परीक्षण स्थळांवर गर्दीची व्यवस्था, सोशल डिस्टन्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांची चाचपणी हा याचा मुख्य उद्देश होता. यादरम्यान लस देण्यात आली नाही, मात्र लसीकरणासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला.

पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस

दरम्यान, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात येईल. यात कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या नागरिकांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना ही लस दिली जाईल. याची यादी देखील सरकारने तयार ठेवली आहे.