उद्या मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजाराचा हफ्ता ट्रान्सफर होणार
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi)योजनेच्या ७ व्या हफ्त्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा हफ्ता ट्रान्सफर केला जाईल. पंतप्रधान कार्यालयातर्फे यासंदर्भात माहिती देण्यात आली. या महिन्याच्या २५ तारखेला म्हणजेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत आर्थिक लाभाचा पुढील हफ्ता मिळणार आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी परिवारांना १८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे वाटप करतील.
तसेच ६ राज्यातील शेतकऱ्यांशी बोलतील. शेतकरी यावेळी या योजनेअंतर्गत आलेला अनुभव शेअर करतील. यावेळी कृषी मंत्री देखील उपस्थित असतील.
२५ डिसेंबरला एका क्लीकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार कोटी रुपये ट्रान्सफर होतील असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. शेतकरी संघटनांनी सरकारचे कायदे समजून घ्यावेत. आम्ही खुल्या मनाने चर्चा करण्यास तयार आहोत. सरकार सर्वांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.
२ हजारांचा हफ्ता
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये देते. आतापर्यंत शेतकऱ्यांना ६ हफ्ते दिले गेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा पहीला हफ्ता डिसेंबर २०१८ मध्ये दिला गेला होता.
यावेळी ३.१५ कोटी ९९ हजार ६२९ शेतकऱ्यांना निधी देण्यात आला. ७ वा हफ्ता १ डिसेंबरला दिला जाईल. गेल्या २३ महिन्यामध्ये केंद्र सरकारने ११.१७ कोटी शेतकऱ्यांना थेट ९५ कोटी रुपयांहून अधिक मदत मिळाली आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा !
तुमचे नाव या यादीत नसेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. कित्येक वेळा रजिस्ट्रेशन करुनही सरकारी मदत येत नाही. त्यामुळे तुमचे नाव या यादीत आहे ता आहे आजच तपासून पाहा. जर यादीत नाव नसेल तर हफ्ता मिळणार नाही हे लक्षात असू द्या.
मागचा हफ्त्यातील पैसे मिळाले नसलेल्यांना चुका सुधारण्याची संधी आहे. यासाठी पंतप्रधान शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. शेतकरी घरबसल्या अर्ज करुन पेपर्स ऑनलाईन अपलोड करु शकतात. ही प्रक्रीया खूप सोपी आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे.
१) पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची वेबसाईट pmkisan.gov.in वर जा
२) वेबसाईटच्या उजवीकडे खालच्या बाजूस Farmers Corner असे दिसेल. त्यावर क्लिक करा.
३) इथे अनेक पर्याय दिसतील.
४) इथे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करु शकता.
५) आधारवरील नावाची स्पेलिंग, अकाऊंट नंबरमधील चुका सुधारायच्या असल्यास हेल्पडेस्कवर क्लिक करा.
६) इथल्या अर्जावर क्लिक करु तुम्ही चुका सुधारु शकता.
७) कोणाला आणखी मदत हवी असल्यास हेल्पलाईन – ०११-२४३००६०६ वर फोन करु शकता.