तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तुमची खिचडी कशी करायची आम्हाला ठाऊक आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
“मी शांत आणि संयमी आहे पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या पद्धतीने कुटुंबावरती किंवा मुलाबाळांवरती येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना सांगू इच्छीतो की तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तुमची खिचडी कशी करायची आम्हाला ठाऊक आहे,” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिला आहे. ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडीच्या आमदारांना त्रास देत असल्याच्या प्रश्नासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचेही म्हटले आहे.
सरकारवर दबाव आणण्यासाठी ईडी सारख्या संस्थांच्या मदतीने महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशत आणि दडपशाही करत आहेत. आमदारांनी गुडघे टेकावेत यासाठी हे सारं केलं जात आहे. याकडे तुम्ही कसं पाहता, असा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी, मला जेव्हा आव्हानं मिळातात जेव्हा जास्त स्पुर्ती येते असं म्हटलं आहे. “तुम्ही महाराष्ट्रातल्या मातीतला जो चमत्कार म्हणालात तो खरोखरच आहे. महाराष्ट्राच्या मातीत एक तेज आहे. महाराष्ट्रावर अनेक संकटं आली, आपत्ती आल्या. भलेभले अंगावरती आले पण काय झालं. जसं मी दसऱ्याच्या भाषणात बोललो होतो त्यात माझ्या आजोबांच्या दसऱ्याच्या पहिल्या भाषणातील संदर्भ दिला होता. महाराष्ट्र हा काही मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. किंबहुना महाराष्ट्राला कोणी डिवचलं तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पहायचे असतील तर पहायला मिळतील. अशी संकट अंगावर घेत आणि त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला. महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि कधी थांबणार नाही. कोणी कितीही आडवे आले तर त्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल,” असं उद्धव यांनी विरोधांना सुनावलं.
“संपूर्ण देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. संपूर्ण एक वर्षानंतर आता उघडपणे आणि निर्ल्लजपणे महाराष्ट्रात अघोरी प्रयोग सुरु झालेत,” असं राऊत यांनी म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना जश्यास तसं उत्तर मिळेल असा इशाराच दिला. “मी शांत आणि संयमी आहे पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या पद्धतीने कुटुंबावर किंवा मुला-बाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना सांगू इच्छीतो की तुम्हालाही कुटुंब आणि मुलं-बाळं आहेत. तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तुमची खिचडी कशी करायची आम्हाला ठाऊक आहे,” असं उद्धव यांनी म्हटलं आहे.