चौथ्या लॉकडाऊन बाबत राज्य सरकारने केल्या सूचना
आंतरजिल्हा आणि आंतरराज्य वाहतूक पूर्णपणे बंद करणार
मुंबई/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागवल्याप्रमाणे राज्यांनी लॉकडाऊन ४ साठी आपापल्या सूचना दिल्या आहेत. अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे, तर काही राज्यांनी सवलती वाढवण्याची शिफारस केली आहे. यासोबतच अनेक राज्यांनी रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन ठरवण्याचा अधिकार द्यावा असंही म्हटलं आहे. १७ मे रोजी देशातील राष्ट्रीय लॉकडाऊनला ५४ दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन ४ साठी आता नवी नियमावली जाहीर केली जाणार आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा हा २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान जाहीर करण्यात आला होता. नंतर ही मुदत ३ मेपर्यंत वाढविण्यात आली. त्यातही वाढ करत लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे पर्यंत वाढविण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचं काय म्हणणं
राज्यातील करोनाचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगाव या ठिकाणी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत कडक करावं, अशी राज्य सरकारीच इच्छा आहे. याशिवाय आंतरजिल्हा आणि आंतरराज्य वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणीही राज्य सरकारने केली आहे. उर्वरित महाराष्ट्रात राज्य सरकारची नियमावली लागू केली जाईल, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.