पंतप्रधानांच्या बैठकीत देशात पुन्हा लॉकडाऊन आणि लसी बाबत होणार चर्चा
नवी दिल्ली : दिवाळीनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होणार आहेत. त्यातील एका बैठकीत लॉक डाऊन आणि दुसऱ्या बैठकीत करोना लस वाटपासंबंधीचं धोरण ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहिल्या बैठकीत नरेंद्र मोदी करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. नंतर इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा असेल. या बैठकीत करोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतील.
दिल्ली तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातील रुग्णसंख्या सध्या दिवसाला ५० हजारापेक्षाही कमी राहत असताना काही राज्यांमध्ये करोना संकट नव्याने उभं राहत असल्याने पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे. नरेंद्र मोदींच्या बैठकीत लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कालच महाराष्ट्रात नागरिकांनी काळजी नाही घेतली तर करोनाची दुसरी लाट नाही तर त्सुनामी येईल अशी भीती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, राज्यातील परिस्थितीचा पुढील काही दिवसात आढावा घेऊन लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी म्हटले होते