विदेशविशेष वृत्त

आश्चर्यकारक:शुद्ध ऑक्सिजनच्या प्रक्रियेमुळे म्हातारपणी पुन्हा तरुणपण

तेल अवीव, 19 नोव्हेंबर : आपण तरुण दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. तरुण दिसण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. एक ना दोन कित्येक उपाय केले जातात.आधी म्हातारपण, मग तरुणपण आणि मग बालपण एखाद्या काल्पनिक कथा किंवा फिल्ममध्येच असं काहीतरी पाहायला मिळतं.

प्रत्यक्ष आयुष्यात तर बालपण, तरुणपण आणि म्हातारपण असंच वयाचं चक्र असतं. मात्र आता वयाचं हे चक्र उलटं फिरवण्याचा मार्ग सापडला आहे.
अनेकदा आपल्याला वाटतं की तरुण होण्याचं एखादं औषध किंवा उपचार असता तर, असाच उपचार या संशोधकांनी शोधून काढला आहे. संशोधकांनी म्हाताऱ्यांना तरुण बनवून दाखवलं आहे.


इज्राइलच्या संशोधकांनी साठी पार व्यक्तींवर अभ्यास केला.
ऑक्सिजनचा वापर करून त्यांनी या वयस्कर व्यक्तींना तरुण बनवलं आहे, तेदेखील फक्त तीन महिन्यात. शुद्ध ऑक्सिजनमुळे वय वाढण्याच्या प्रक्रियेला उलट करता येऊ शकतं, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार जर्नल एजिंगमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
64 वयाच्या 35 निरोगी व्यक्तींचा या अभ्यासात समावेश होता. या सर्वांना ऑक्सिजनच्या प्रेशरनं भरलेल्या चेंबरमध्ये बसवण्यात आलं होतं आणि मास्कमार्फत 100 टक्के शुद्ध ऑक्सिजन देण्यात आलं होतं. 90 मिनिटांची ही प्रक्रिया दर पाच दिवसांनी होत होती. तीन महिने हा असाच प्रयोग सुरू होता. यामुळे टेलोमेर्समध्ये 20 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं.
टेलोमेर व्यक्तीच्या क्रोमोसॉमला संरक्षण देतं, ज्यामुळे एज रिव्हर्सल म्हणजे वृद्धत्व येण्याची प्रक्रिया मंदावते. वाढत्या वयासोबत टेलोमेर्स कमी होऊ लागतात. ज्यामुळे अल्झाइमर, पार्किंसन, कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. मात्र या प्रयोगामुळे साठी पार वयाच्या या व्यक्तींमध्ये टेलोमेर्सची मात्रा तरुणांप्रमाणे वाढली.
तेल अवीव हायपरबेरिक मेडिसिन अँड रिसर्चमध्ये काम करणारे या संशोधनाचे अभ्यासक डॉ. आमिर यांनी सांगितलं, आतापर्यंत जीवनशैलीत बदल आणि कठीण असे व्यायाम करून असा फायदा पाहायला मिळायचा. मात्र शुद्ध ऑक्सिजनच्या प्रक्रियेच्या मदतीनं फक्त तीन महिन्यांच्या थेरेपीमुळे टेलोमेर लक्षणीय प्रमाणात वाढलं आणि हे आश्चर्यजनक आहे.