महाराष्ट्रमुंबई

मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यातील सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम आणि पूर्व भागात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या पट्टय़ाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि त्यानंतर विदर्भ मराठवाडय़ासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

ल्ल दिवाळीपूर्वी राज्याच्या सर्वच भागांतील रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा नीचांकी पातळीवर गेला होता.

ल्ल या वेळी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभावही होता. मात्र, हवामानाने एकदमच फिरकी घेतली. बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा सुरू झाल्याने बहुतांश भागात ढगाळ स्थिती निर्माण होऊन थंडी कमी झाली.

  • सद्य:स्थितीत सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. परिणामी थंडी गायब झाली आहे.
  • राज्यात ८ ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान खाली आलेला पारा आता १७ ते २० अंशांपर्यंत वाढला आहे.