अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई – अर्णब गोस्वामी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान अर्णब यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावार तातडीने निर्णय घेता येणार नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे अर्णब यांची न्यायालयीन कोठडी कायम राहणार आहे.
अर्णब गोस्वामी यांना केलेल्या अटकेबाबत रायगड पोलिसांकडू जेष्ठ विधिज्ञ अमित देसाई हे उच्च न्यायालयात युक्तिवाद करीत आहेत.
आपल्याला आपल्या घरून चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर आहे. असा दावा अर्णब गोस्वामीकडून केला जात आहे. त्याल प्रत्युत्तर म्हणून देसाई यांनी अर्णब यांचा दावा खोडून काढला. हेबिबस कॉर्पस या रिट अंतर्गत जामीन मिळावा अशी मागणी अर्णब यांच्याकडून करण्यात आली आहे. परंतु अर्णब यांना जामीन हवा असेल तर त्यांनी, रायगड जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करावी. कारण हे प्रकरण रायगड जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत येते. त्यामुळे कायदेशीर रित्या उच्च न्यायालय या बाबत जामीन देऊ शकत नाही. त्यामुळे आरोपींनी आधी रायगड जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज करायला हवा. अशा आशयाचा युक्तीवाद देसाई यांनी केला आहे.
अर्णब गोस्वामी यांचे वकील हरिष साळवे यांनी वारंवार अर्णब यांच्या जामीनाची मागणी लावून धरली होती. परंतु न्यायालयाने यावर तत्काळ निर्णय घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. तरी अलिबाग येथील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्याचा पर्याय अर्णब यांना सुचवण्यात आला आहे. अलिबाग न्यायालयाने कोणत्याही प्रभावात न येता यावर सुनावणी घ्यावी असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तुर्तास तरी अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.