बीड जिल्ह्यात लॉक डाऊन मध्ये शिथिलता;आजपासून वेळेत बदल
बीड जिल्ह्यात आजपासून एक दिवसाआड सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व किरकोळ दुकाने उघडणार
बीड प्रतिनिधी -: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी पहाटे जिल्ह्यासाठी नवीन आदेश काढले आहेत. आज दिनांक 13 मे पासून ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने विषम दिनांकास म्हणजेच एक दिवसाआड सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. किरकोळ किराणा दुकानासह इतर सर्व प्रकारची दुकाने आता एक दिवस आड उघडण्यासही सूट देण्यात आली आहे. मात्र त्यातून भाजीपाला व फळे यांची दुकाने वगळण्यात आली आहेत. या निर्णयाने नागरिकांना आणि व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी पहाटे काढलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, आज दिनांक 13 मे पासून पुढील आदेशापर्यंत विषम दिनांक म्हणजेच एक दिवसाआड सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने, किराणा दुकान उघडण्यास ( भाजीपाला ,फळे यांची दुकाने वगळून ) परवानगी देण्यात येत आहे. निडलीॲप विषयी दिनांक 9 मे रोजीच्या संपूर्ण आदेशास कसल्याही प्रकारचा प्रतिबंध नसला तरीही त्याचा वापर सर्व किराणा दुकानदारांच्या सहकार्याने सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी या ॲपचा अधिकाधिक वापर करून घरा बाहेर येणे काढण्याचा पूर्ण प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
■■ सर्व घाऊक होलसेल विक्रेत्यांची दुकाने विषम दिनांकास म्हणजे ज्या दिवशी संचारबंदीतून सूट देण्यात आलेली आहे. त्या दिवशी दुपारी 3 नंतर आणि सम दिनांकास म्हणजेच ज्या दिवशी संचारबंदी शिथिल नसेल त्यादिवशी पूर्ण दिवस होलसेल दुकाने ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच काळामध्ये किरकोळ दुकानांना होलसेल दुकानातून किंवा अन्य मार्गाने सामान आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
■■ विषम दिनांक म्हणजे ज्या दिवशी
संचारबंदीतून सूट असेल त्यादिवशी सकाळी 6.30 ते दुपारी 2.30 या काळात शहरी भागामध्ये सर्व प्रकारच्या मालवाहू गाड्या पिकप व्हॅन, छोटा हत्ती, ट्रक इत्यादी सह सर्व वाहनांना प्रवेशास मनाई असेल.
■ ■ वाहतूक पास असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस चार चाकी, ऑटो, दुचाकी यांच्या वापरास शहरी भागात संपूर्ण मनाई असेल. परंतु शासकीय शाळा वस्तीगृह इत्यादी बंद असणाऱ्या शासकीय आस्थापनेवरील कर्मचारी वगळून इतर सर्व शासकीय कर्मचारी बँक कर्मचारी व इतर जीवनावश्यक सेवेतील व्यक्तींना सवलत देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.
■■ पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात यापूर्वीचे आदेश कायम राहतील त्या निर्देशाप्रमाणे इंधन देण्यात यावे.
■■ वधू आणि वरा व्यतिरिक्त दहा पेक्षा जास्त व्यक्ती जमणार नाही अशा घरगुती विवाहास परवानगी देण्यात आली आहे.
■■ केश कर्तनालय म्हणजेच कटिंगची दुकाने ब्युटी पार्लर यांच्यासाठी याआधीचे आदेश कायम राहतील असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट करत त्यांना परवानगी दिलेली नाही.
■■ जी कामे याआधी कोणत्याही विषम दिनांकास सकाळी 7 ते 9.30 या वेळेत करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती ती सर्व कामे आता सर्व विषम दिनांकास सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात बँकांसह सुरू राहणार आहेत. त्यामुळे आता बँकासुद्धा एक दिवसा आड दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील.
■■ शहरी भागातील व्यवसायिक परिसरातील सर्व प्रकारची शासकीय तसेच खाजगी बांधकामे व रस्त्यांची कामे विषम दिनांकास म्हणजे ज्यादिवशी संचारबंदीतून सूट असेल त्यादिवशी सकाळी 6.30 ते दुपारी 2.30 ही वेळ वगळता म्हणजे अन्य वेळेत करता येतील. परंतु या कामामुळे कोणत्याही प्रकारे, कोणत्याही वेळी वाहतुकीस अडथळा अथवा गर्दी होऊ नये.
■■ सदर आदेशातील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत असताना नागरिकांनी कोठेही गर्दी करू नये. सामाजिक अंतराचे भान ठेवावे मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोवीड – 19 या विषाणूचा प्रभाव थांबवण्यासाठी सर्व आवश्यक ती काळजी घ्यावी. आणि केवळ आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडावे असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.