महाराष्ट्रमुंबई

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी कठोर बंधनांची तयारी ठेवा- मुख्यमंत्री

मुंबई: जगभरात कोरोनाची दुसरी लाट उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तिला रोखण्यासाठी कठोर बंधनांची तयारी ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. रात्रीचे व्यवहार, गर्दी, सण, समारंभ, कार्यक्रम यावरील निर्बंध आणखी ६ महिने सुरूच राहतील, असे सूतोवाचही त्यांनी केले. ब्रिटनसह अन्य देशात शिथिल केलेली बंधने पुन्हा लागू केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘लॉकडाऊन’मुळे ठप्प झालेले अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या युवा पिढीमार्फत घरातील ज्येष्ठांना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी काही कठोर नियम करावे लागतील. त्याचे प्रभावीपणे पालन केले जावे यासाठी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात कोविडची परिस्थिती आणि केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी विभागवार आढावा घेण्यात आल्या आहेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनावश्यक अथवा चुकीच्या औषधांचा वापर केला जाऊ नये, यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येत आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.