पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून ६ हजार ऐवजी आता मिळणार ११ हजार रुपये ?
देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून कृषी खर्च आणि किंमत आयोगाने पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना ५००० रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत ११ कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत. त्यांना दरवर्षी ६००० रूपये दिले जातात. सरकारने ही शिफारस मान्य केली तर सरकार दरवर्षी खत अनुदानासह शेतकऱ्यांना ११,००० रुपये देईल.
शेतकऱ्यांना खताचे अनुदान म्हणून दरवर्षी ५००० हजार रुपये रोख द्यावे, असे आयोगाने म्हटले आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) वर्षातून दोनदा हस्तांतरित करता येईल, अशी शिफारसही आयोगाने केली आहे.
खरीप आणि रब्बी हंगामनिहाय प्रत्येकी २५०० रुपये असे दोन्ही हंगामाचे मिळून ५००० रूपये द्यावेत असे आयोगाचे म्हणणे आहे.
दरम्यान, कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमती (एमएसपी) वर केंद्र सरकारला सल्ला देण्याच्या आयोगाच्या शिफारसींचा विचार केला गेला तर पंतप्रधान सन्मान निधीच्या वार्षिक ६००० रुपयांच्या व्यतिरिक्त, ५००० रुपयांचे खत अनुदानही डीबीटी व्दारे जमा होईल. जर सरकारने खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले, तर खताच्या स्वस्त विक्रीसाठी कंपन्यांना देण्यात येत असलेले अनुदान द्यावे लागणार नाही.
खत कंपन्यांना केद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना सध्या बाजारात युरिया आणि डीएपी सारखी खते स्वस्त दरात मिळतात. यामध्ये सरकार सवलतीच्या किंमतीसह वास्तविक किंमत आणि अनुदानित किंमतीच्या फरकाइतकी रक्कम कंपन्यांना देत असते.असे जर झाले तर शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे.