आज भारत बंदची हाक:२०८ शेतकरी संघटना रस्त्यावर
नवी दिल्ली/ मुंबईः मोदी सरकारने संसदेत चर्चेविनाच बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी या बंदचे आवाहन केले आहे. या बंददरम्यान देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरतील असे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकऱ्यांनी मोठ्या लढ्याचे रणशिंग फुंकले असल्याचे सध्याचे चित्र असून या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम पंजाब आणि हरियाणामध्ये दिसू लागला आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशातील बहुतांश राजकीय पक्षांचा पाठिंबा असून काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी इत्यादी राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून ते शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात उतरणार आहेत.
महाराष्ट्रात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर कृषि विधेयकांची होळी करण्याची घोषणा केली आहे.
मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारी, बाजार समित्यांचे अस्तित्व पुसणारी व शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटली आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती आणि शेतकऱ्यांची द्रोह करणारी आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि २०८ शेतकरी संघटनांचा देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आजचा हा बंद पुकारण्यात आला आहे.
तिकडे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी कालपासूनच कृषी विधेयकांच्या विरोधात रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन तीन दिवस चालणार आहे. काल शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावरच धरणे दिली.
आधी हात जोडले, आता दिल्ली हादरवूः कृषी विधेयकांवरून एनडीएच्या घटक पक्षांतच फूट पडली आहे. एनडीएचा जुना घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या मोदी सरकारमधील मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी या कृषी विधेयकांच्या विरोधात तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कृषी विधेयके आणू नका म्हणून आधी आम्ही मोदी सरकारला हात जोडले. पण त्यांनी ऐकले नाही. आता दिल्ली हादरवू, असा इशाराच बादल यांनी दिला आहे.