सत्यतेची पडताळणी: भारतात २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन !
नवी दिल्ली: कोरोना संकटावर (Corona Crisis) मात करण्यासाठी भारतात (India) २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) होणार अशा स्वरुपाची बातमी (NEWS) व्हायरल (Viral) होत आहे. ही बातमी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनातले संभ्रम दूर करण्यासाठी पीआयबी या सरकारी संस्थेने पुढाकार घेतला. पीआयबी अर्थात प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (Press Information Bureau) या केंद्र सरकारच्या (Government of India) अखत्यारित काम करणाऱ्या संस्थेने व्हायरल बातमीच्या सत्यतेची पडताळणी (Fact Check) केली आणि अहवाल दिला. (Fact Check – Lockdown in India from 25th September)
भारताच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी (National Disaster Management Authority) या संस्थेने लॉकडाऊन करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला, अशा स्वरुपाचे वृत्त व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ सप्टेंबरपासून लॉकडाऊन करण्याची शिफारस केलेली नाही.
भारतात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. याच कारणामुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत विचार होत असल्याचे वृत्त असत्य आणि दिशाभूल करणारे आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन करण्याची शिफारस केलेली नाही.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी पुढे करायच्या उपायांवर चर्चा करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत.
निष्कर्ष – भारतात २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन ही अफवा आहे. कृपया अफवेवर विश्वास ठेवू नका.