महाराष्ट्रमुंबई

सेवानिवृत्तासाठी:हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत 31 डिसेंबर

राज्य सरकारकडून सेवानिवृत्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत दाखला सादर करता येईल. केंद्र सरकारने दिलेल्या मुदतवाढीच्या धर्तीवर राज्य सरकारने शुक्रवारी (ता. १८) आदेश पारीत केले आहेत.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय

केंद्र किंवा राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दर वर्षी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या हयातीचा दाखला सादर करावयाचा असतो. त्यांनी सेवा केलेल्या कार्यालयात किंवा निवृत्तिवेतन घेत असलेल्या बॅंकेत दाखला सादर केला जातो.
त्या माध्यमातून कोषागारास दाखला प्राप्त होतो. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही मुदतवाढ देण्याचे निश्‍चित केले. ३० नोव्हेंबरऐवजी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत हयातीचा दाखला सादर करता येईल. राज्य सरकारचे उपसचिव इंद्रजित गोरे यांनी शासकीय परिपत्रकही शुक्रवारी प्रसिद्ध केले.

१ ऑक्टोबर २०२० ला ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ८० वर्ष पूर्ण होत आहे त्यांनी १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत दाखला सादर करावयाचा असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठ, तसेच जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त वेतनधारकांना सरकारच्या परिपत्रकातील आदेश लागू राहील.