ग्रामीण भागात पसरतोय कोरोना! Sero सर्व्हेचा दुसरा टप्पा असू शकतो आणखी भीषण
नवी दिल्ली-सिरो सर्व्हेचा (Sero Survey) पहिला अहवाल पाहूनच धडकी भरली आहे, आता दुसऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे, मात्र हा दुसरा अहवाल किती भीषण असू शकतो याचं चित्र महाराष्ट्रातील आकडेवारीवरूनच समोर येतं आहे.
देशात रुग्णसंख्या वाढण्यास पूर्ववत झालेले व्यवहार, वाढणारी गर्दी, लोकांचा बेफिकीरपणा, मास्क न लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं ही मुख्य कारणं आहेत असा तज्ज्ञांचा दावा आहे.
संपूर्ण भारतात सध्या 60 लाखांहून आधिक रुग्ण असून महाराष्ट्रातच यातले 10 लाखांवर Covid रुग्ण आहेत. जवळपास 75 हजार रुग्णांचा मृत्यू देखील देशात झाला आहे. कोरोनारुग्णांची ही मृत्यूसंख्या जगभरात तिसऱ्या क्रमांकाची आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, भारतात सर्वाधिक रुग्णसंख्या असली तरीदेखील मृत्यूदर सर्वात कमी आहे. त्यामुळे जगभरात सर्वात जास्त मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर असला तरीदेखील एकूण रुग्णांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर आटोक्यात आहे, असं आकडेवारी सांगते. पण तज्ज्ञांच्या मते ही, आकडेवारी फसवी असून भारतात आरोग्य व्यवस्था तोकडी आहे.
कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात टेस्ट होत नसल्यामुळे (Covid test) अनेक मृत्यू कशामुळे झाले आहेत हे समोर येत नाही. मृत्यू झालेल्या रुग्णांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे की नाही हे समजत नाही. अनेक रुग्णांना वेळेत सेवा मिळत नसून यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा संदिग्ध अवस्थेतल्या रुग्णांचा आकडा बराच मोठा असू शकतो. त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर जेवढा कमी असल्याचं दाखवलं जातं, तेवढा तो खराच कमी आहे का याचा कोणताही ठोस पुरावा भारताच्या आरोग्य विभागाकडे नाही.
त्यामुळे तज्ज्ञांनी भारतातील कोरोनाबाबत सांगितलेली ही वास्तव परिस्थिती आणि सिरो सर्व्हेचा पहिला रिपोर्ट यानंतर दुसरा रिपोर्टमध्ये किती भयावह आकडेवारी असू शकते, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.