यापुढे विद्यार्थी संख्येनुसारच शिक्षक पद मान्यता मिळणार
पुणे – राज्यातील विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील पूर्वीची विद्यार्थी संख्येमुळे कमी झालेली शिक्षकांची पदे विद्यार्थी संख्या असल्यास मंजूर करण्यात येणार आहेत. त्याबाबतची माहिती माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने मागविली आहे.
विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षक, कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करुन त्यांची भरती करण्यात येत असते. यासाठी शासनाकडून संच मान्यता घेणे आवश्यक असते. सन 2014-15 ते 2016-17 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येमुळे कमी झालेली पदे विद्यार्थी संख्या असल्यास सन 2017-18 मध्ये मंजूर करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला होता. पूर्वीच्या मंजूर पदाच्या मर्यादेत सन 2019-20 मध्ये पदे मंजूर करण्याऐवजी संच मान्यता सन 2018-19 च्या स्थितीच्या अनुषंगाने मंजूर करुन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
शाळांमध्ये पद देय होत असेल आणि विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षक अतिरिक्त ठरला असेल, अशा शिक्षकांस संच मान्यतेत पद मंजूर झाल्यापासून सेवेत पूर्ववत घेऊन या शिक्षकास सेवा संरक्षण देण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी 25 जून 2020 रोजी जारी केले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या पदांची माहिती संकलित करुन ती एकत्रित शिक्षण संचालनालयास ई-मेलद्वारे तात्काळ सादर करण्यात यावी, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सर्व विभागीय उपसंचालकांना दिल्या आहेत.