गेवराईबीड

देशसेवेसाठी जाणाऱ्या जवानाचा अपघाती मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत तांदळा येथील जवान शहीद

गेवराई : तालुक्यातील तांदळा येथील बिभीषण सिरसट हे सीआरपीएफ मध्ये नोकरीला होते. मंगळवारी देशसेवेसाठी जातांना त्यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून तांदळा गावासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेवराई तालुक्यातील तांदळा गावचे भूमिपुत्र बिभीषण सीताराम सिरसट हे 2000 साली सीआरपीएफ मध्ये रुजू झाले होते. देशाच्या विविध भागात त्यांनी तब्बल 20 वर्ष कर्तव्य बजावले आहे. मार्च महिन्यात ते रजेवर गावी आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे गावकडेच अडकून पडले होते. गेल्या आठ दिवसापूर्वी त्यांना कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश आले होते, त्यामुळे मंगळवारी ते रुजू होण्यासाठी निघाले होते. तांदळा येथून चारचाकी वाहनाने ते नगर येथे जाणार होते, तत्पूर्वी नातेवाईकांना भेटून गावाकडे जात असतानाच मंगळवारी सायंकाळी 6 वाजता कल्याण- विशाखापट्टणम महामार्गावर साठेवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती निधनाने तांदळा गावावर शोककळा पसरली असून जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी जिल्हारुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुले, आई-वडील असा परिवार आहे.