कोरोनाची लागण झाली हे कसे व कधी कळते:कधी टेस्ट करावी
आपण कोरोनाची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आलो तर आपल्यालाही लागण होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच हे कळल्या कळल्या अनेकजण भीतीपोटी किंवा एकदाचं टेन्शन गेलेलं बरं असं म्हणून कोव्हिडची टेस्ट करून घेतात. बरेचदा अशी टेस्ट निगेटिव्हही येते. कारण, ती करण्याची वेळ चुकलेली असते.
कधी होते लागण?
कोरोनाची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आल्यावर लगेचच आपल्याला लक्षणं दिसत नाहीत किंवा लगेचच आपल्यामुळे इतरांना लागणही होत नाही. त्यामुळेच लागण झालेल्या पेशंटच्या संपर्कात आल्याचं आपल्याला कळल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट करायची की नाही, कधी करायची या गोष्टी समजून घ्याव्या लागतील.
कोव्हिड 19 या आजाराचे वायरस एका माणसाकडून दुसर्या माणसाकडे पसरतात; पण हा प्रसार आपण कोरोना वायरसची लागण झालेल्या एखाद्या माणसाच्या खूप जवळून संपर्कात आलो असू तरच होतो. लागण झालेल्या माणसाच्या श्वसनसंस्थेतल्या द्रव्याच्या थेंबात कोरोनाचे वायरस असतात. माणूस खोकताना, शिंकताना किंवा बोलताना त्यांच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे हे वायरस आपल्यापर्यंत पोहोचतात.
आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की कोरोनाची लागण झालेल्या सगळ्यांकडूनच त्या वायरसचा प्रसार आपल्यापर्यंत होत नाही. मास्क आणि शारीरिक अंतर पाळलं असेल तर लागण होण्याची शक्यता फारच कमी होते. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन स्टेट डिपार्टमेंट ऑफ हेल्थकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे, 6 फुटांपेक्षा कमी अंतरावरून आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो असू तरच आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असते. अशा व्यक्तीला जवळून संपर्कात आलेली व्यक्ती असं म्हटलं जातं.
उगाच टेस्ट नको
या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये घरच्या लोकांचा जास्त समावेश होतो. अनेकदा घरातल्या एका व्यक्तीमुळे कुटुंबातल्या इतरांनाही कोरोनाची लागण झाल्याचं आपण पाहतो. तसंच, कोरोनाची लागण झालेल्यांकडे काम करणार्या कामगारांना वायरसचा संसर्ग होतो किंवा उलट कधीतरी लागण झालेल्या कामगारांकडूनही आपल्यापर्यंत वायरस येण्याची शक्यता असते.
अनेकदा आरोग्य व्यवस्थेतले कर्मचारी आपण कोरोनाची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आलो असल्याची माहिती आपल्याला फोन करून कळवतात. अशा आरोग्य कर्मचार्यांचा फोन आला किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरच आपल्याला कोव्हिडची लागण झाल्याची शक्यता असू शकते. अशी शक्यता असेल आणि आपल्याला लक्षणं दिसत असतील तरच टेस्ट करावी, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
टेस्टचा रिपोर्ट आलेला नाही; पण आपण जवळून संपर्कात आलेल्या माणसाला फक्त सर्दी, ताप आलायं, डोकं दुखतंय म्हणून आपण टेस्ट करायला जाणं योग्य नाही. किंवा आपल्या खात्रीसाठी लक्षणं नसतानाही टेस्ट करणं बरोबर नाही, असं वॉशिंग्टन हेल्थ डिपार्टमेंटच्या परिपत्रकात दिलंय.
टेस्ट कधी करावी?
कोरोनाची लागण झाल्यानंतर लक्षणं दिसायला जवळपास 14 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. बहुतेक पेशंटमध्ये 5 दिवसांनंतरच लक्षणं दिसायला सुरुवात होते. शिवाय, लागण झाल्यानंतर 4 दिवसांनी आपल्यामुळे इतरांना लागण होण्याचा काळ सुरू होतो. या 4 दिवसांच्या आतच टेस्ट केली तर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. त्यामुळेच, कोरोनाची लागण झाल्या झाल्या लगेचच टेस्ट करू नये.
लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आलो होतो हे कळल्यावर लगेचच आपण स्वतःला क्वारंटाईन केलं पाहिजे. या क्वारंटाईनच्या काळात आपल्याला काही शारीरिक त्रास होतोय का यावर लक्ष ठेवायला हवं. थर्मामीटरने आपल्या शरीराचं तापमान मोजत राहायला हवं. कुठलीही औषधं न घेता आपल्याला ताप, सर्दी होत नाहीय ना याची काळजी घ्यायला हवी.
पाच दिवसांनंतर लक्षणं दिसू लागली तरच टेस्ट करणं योग्य ठरेल. सध्या कोरोना लागण ओळखण्यासाठीच्या अनेक टेस्ट उपलब्ध आहेत. स्वॅब टेस्ट, नेझल टेस्ट, अँटिबॉडीची टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्टपैकी पीसीआर म्हणजेच वायरस आहे की नाही हे शोधणारी टेस्ट करावी. लागण झाली असेल तर पाचव्या दिवसापासून ते तिसाव्या दिवसापर्यंत आपण कोरोना पॉझिटिव्ह येतो.
पण 5 दिवसांनंतरही लक्षणं दिसलीच नाहीत तर मात्र पुढचे 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागेल. 14 दिवसांनंतरही आपल्याला लक्षणं दिसली नाहीत किंवा काहीही त्रास झाला नाही तर आपण जिंकलो असं म्हणू शकतो. कोरोनाची लागण आपल्याला झालेली नव्हती, असं म्हणू शकतो. 14 दिवसांनंतर आपण पुन्हा घराबाहेर पडून आपापल्या कामाला लागू शकतो