महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम आता ‘महसूल सहायक
मुंबई-प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या प्रमुख मागण्यांपैकी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम ‘महसूल सहायक’ केल्याचे राज्य शासनाने 20 आँगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात नमुद केले,असे येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा शाखेचे जेष्ठ पदाधिकारी प्रशांत कपडे, भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.
गुरुवारी राज्य शासनाचे सह सचिव डाँ. संतोष भोगले, यांनी डिजीटल स्वाक्षरीद्वारे महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम ‘महसूल सहायक’ केल्याचा आदेश जारी केला आहे.
संघटनेच्या काही मागण्यां पैकी ही एक मागणी मान्य करून शासन निर्णयही जारी झाला आहे.वास्तविक ही मागणी राज्य संघटनेच्यावतीने 1987 पासून वारंवार करण्यात येत होती. यासाठी 1995 साली तत्ककालीन सुनिल जोशी, रविंद्र देशमुख, आर.जे.पाटील आदी जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसांचा संपही झाला होता, असेही कापडे, यांनी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत साळवी, यांच्या मार्गदर्शनाची साक्षी देत स्पष्ट केले.
‘लिपीक’ पदाचे आता ‘महसूल सहायक’, असे नामकरण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी व अधिकारी यांनी आनंद व्यक्त करून समाधान व्यक्त केले. त्याबद्दल राज्य महसूल संघटनेचे मागील सर्व पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व कर्मचारी यांनी राज्य महसूल संघटनेवर विश्वास दर्शवून पाठिंबा देऊन सर्वांची साथ आणि सहयोग व मार्गदर्शन मिळाल्याने आम्ही राज्य महसूल संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, अपर मुख्य सचिव, महसूल व वित्त सचिव, सचिव सा.प्रशासन आदींचे राज्य महसूल संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करीत आहोत, असे कापडे यांनी सांगितले.