खुशखबर; भारतीय कोरोना लसीचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत,लवकरच दुसरा टप्पा सुरू
नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेक कंपनीने कोरोनाची लस विकसित केली आहे. या लसीची मानवी चाचणी करण्यात आली आहे. प्राथमिक स्वरुपात चाचणी केलेल्या लसीचे प्राथमिक परिणाम सकारात्मक आले आहे. देशातील १२ ठिकाणी ३७५ स्वयंसेवकांवर कोवॅक्सिनची चाचणी करण्यात आली असता त्याची कोणत्याही प्रकारचे चुकीचे परिणाम अर्थात साईड इफेक्ट दिसून आलेले नाही. यावरून लस सुरक्षित असल्याचे दिसून येते. मानवी चाचणीत कोणत्याही प्रकारच्या चुकीचे परिणाम आढळून आला नाही, अशी माहिती रोहतक पीजीआयमधील प्रमुख निरीक्षक सविता वर्मा यांनी दिली. सर्व १२ ठिकाणांहून चाचणीचे परिणाम सकारात्मक आल्यास भारत बायोटेककडून दुसऱ्या टप्प्यासाठी भारतीय औषध नियामक संचालनालयाकडे परवानगीसाठी अर्ज केला जाईल.
स्वयंसेवकांना आता लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. यासाठी निरीक्षक आता रक्ताचे नमुने जमा करत आहेत. ज्याच्या आधारावर या लसीची रोगप्रतिकारकशक्ती किती आहे त्याचा आढावा घेतला जाईल. ‘सध्या तरी ही लस अत्यंत सुरक्षित आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये हे औषध किती गुणकारी आहे याचा शोध घेण्यासाठी नमुने जमा केले आहेत’, अशी माहितीही सविता वर्मा यांनी दिली.
कोवॅक्सिन ही भारताची पहिली लस आहे, जी भारत बायटेकने आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयसीएमआरने पुण्याच्या संस्थेत विलग केलेले करोना विषाणू घेऊन ही लस निर्मिती केली जात आहे.