अंबाजोगाईबीड

अवघ्या १३ तासात सहा कोरोना रूग्णांचा स्वाराती रूग्णालयात मृत्यू

अंबाजोगाई दि : कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्ये बरोबरच कोरोना रूग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याचे चिंतेचे वातावरण आहे. अत्यावस्थ झालेल्या कोरोना रूग्णांवर अंबाजोगाईतील स्वाराती रूग्णालयात उपचार करण्यात येतात. मंगळवारी रात्रीपासून अवघ्या १३ तासात सहा कोरोना रूग्णांचा स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यात तीन पुरूष आणि तीन महिला रूग्णांचा समावेश असून ते अंबाजोगाई, परळी आणि केज तालुक्यातील आहेत.

परळीतील शांतीनगर येथील ६८ वर्षीय महिलेस सोमवारी सायंकाळी उपचारासाठी स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा मंगळवारी रात्री १० वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी येथील ६० वर्षीय पुरूषाला रविवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचा मंगळवारी रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाईतील देशपांडे गल्लीतील रूग्णास मंगळवारी रात्री दहा वाजता दाखल केले होते. त्या रूग्णाचा बुधवारी पहाटे १.४० वाजता मृत्यू झाला. स्वाराती रूग्णालय परिसरातील शनिवारी पाॅझिटीव्ह आलेल्या ६१ वर्षीय महिलेचा मंगळवारी रात्री ८.२० वाजता मृत्यू झाला. केजच्या अहिल्यादेवी नगर येथील रविवारी पाॅझिटीव्ह आलेल्या ४६ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाईतील झारे गल्लीतील मंगळवारी पाॅझिटीव्ह आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा बुधवारी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला.
अंत्यविधीला वेटींग
एकाच वेळी सहा मृतदेह आल्याने अंत्यविधीला वेटिंग करण्याची वेळ नगरपालिका प्रशासनावर आली असून अंत्यविधी साठी लागणारे लाकडं ओले मिळत असल्याने बरीच अडचण अंत्यविधीसाठी येत असून त्यासाठी विद्युत शेवदाहीनी हा निर्माण करणे महत्त्वाचे असून तसे लेखी मागणी नगरपरिषद स्वच्छता निरिक्षक अनंत वेडे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे