पाच वर्षांपेक्षा कमी नोकरी झालेल्यांनाही ग्रॅच्युईटीचा फायदा;शासन नियम बदलणार
एकाच कंपनीत किंवा संस्थेत किमान पाच वर्षे काम केल्यास कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीचा फायदा मिळतो; परंतु आता ही पाच वर्षांची अट काढून टाकण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा कमी नोकरी झालेल्यांनाही ग्रॅच्युईटी मिळण्याची शक्यता आहे.
नोकरीमध्ये असुरक्षितता आणि जादा वेतन मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन सतत नोकरी बदलण्याचे प्रमाण देशात वाढले आहे.
कोरोनानंतर नवीन नोकरी शोधण्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. तसेच देशात कंत्राटी कामगारांचीही संख्याही वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना ग्रॅच्युईटीचा लाभ मिळण्यात अडचण होते. यातून मार्ग काढण्यासाठी पाच वर्षे सलग एकाच ठिकाणी नोकरी हा नियम लवचिक करण्याच्या विचारात सरकार असल्याचे वृत्त ‘मिंट’ या वेब पोर्टलने दिले आहे.
काय बदल होऊ शकतो
पाच वर्षे आणि त्यापेक्षा जास्त कार्यकाळ नोकरी केलेल्या कर्मचाऱयाला ग्रॅच्युईटी दिली जाते. नोकरीच्या एकूण कार्यकाळातील प्रत्येक वर्षांचा पंधरा दिवसांचा पगार कंपनी कर्मचाऱयाला देते.
यामध्ये बदल करताना हा कार्यकाळ एक ते तीन वर्षे करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.
पाच वर्षे एकाच कंपनीत नोकरी ज्यांची झालेली नाही त्यांनाही ग्रॅच्युईटीचा लाभ मिळेल. यामुळे देशातील लाखो कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
संसदेच्या स्थायी समितीने ग्रॅच्युईटीची मर्यादा कमी करण्याची शिफारस सरकारकडे केल्याचे वृत्त आहे. नव्याने तयार होत असलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्यामध्ये याचा समावेश होण्याची शक्यता आहे.