महाराष्ट्रमुंबई

देशातील टॉप फाइव्ह मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा समावेश

मुंबई: करोनाच्या काळात महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळल्याबद्दल कौतुक झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेश झाला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे
इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘मूड ऑफ द नेशन’ नावानं हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागांतील लोकांची मतं जाणून घेण्यात आली. त्यांना आपापल्या राज्यातील सरकारबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यापूर्वी जानेवारी महिन्यात असाच सर्व्हे करण्यात आला होता. त्याच्याशी तुलना करता उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढल्याचं दिसून येतं. उद्धव चांगले काम करत असल्याचं मत ७ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे.
पहिल्या क्रमांकावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता यावेळी आणखी वाढली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षात १८ टक्के लोकांनी योगींच्या कामाचं कौतुक केलं होतं. आता २४ टक्के लोकांनी त्यांचं काम चांगलं असल्याचं म्हटलं आहे. अपहरण व खुनांच्या प्रकरणांवरून योगी सरकारवर टीका होत असतानाही त्यांची लोकप्रियता टिकून आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे १५ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, आंध्र प्रदेशचे वाय एस जगनमोहन रेड्डी हे ११ टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ममता बॅनर्जी व नितीश कुमार यांची लोकप्रियता घटल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेसशासित राज्यांचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *