उर्ध्व कुंडलिका धरण लगतच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
वडवणी दि.२३(प्रतिनिधी) वडवणी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून रात्रीच्या वेळी जर जोरात पाऊस किंवा अतिवृष्टी झाली तर वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार असून परिणामी या धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात येणार आहे तरी या प्रकल्पाच्या नदीकाठी असणाऱ्या लगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अशी माहिती माजलगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती.शोभा ठाकूर व वडवणी तहसीलदार श्रीकिशन सांगळे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सध्या वडवणी तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच लघु मध्यम प्रकल्प, नदी, नाले, विहीरी, तलाव ओसंडून वाहत आहेत. परिणामी सतत पडणाऱ्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनही योग्य ती दक्षता व खबरदारी घेत असून वडवणी तालुक्यातील मुख्य मध्यम जलप्रकल्प असणाऱ्या सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पामध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला असून प्रकल्प संपूर्णपणे व पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ काही अंशी जागा शिल्लक आहे. परंतु वडवणी तालुक्यातील मुसळधार पडणार्या पावसाचा तसेच अतिवृष्टीचा अंदाज घेऊन हा प्रकल्प आज किंवा उद्या रात्रीच्या वेळी अचानकपणे पूर्णपणे भरल्यास या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग हा पुढे नदीपात्रात केला जाणार असून परिणामी या प्रकल्पालगतच्या व नदी पात्राकाठच्या सर्व गावांना याचा सतर्कतेचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. तरी नदीपात्रा लगतच्या सर्व शेतकरी व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देत या नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये तसेच कोणीही नदीपात्रात आपली जनावरे सोडू नये सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व संबंधित गावाच्या तलाठी व ग्रामसेवक यांना याबाबत गावात दवंडी देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती माजलगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती.शोभा ठाकूर तसेच वडवणी तहसीलदार श्रीकिशन सांगळे यांनी दिली आहे.