सावधान! ‘या’ प्रकारचे एन-९५ मास्क वापरणे घातक, केंद्राचा इशारा
नवी दिल्ली : जगाला हतबल करून सोडणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशात झपाट्याने होत आहे. याला रोखण्यासाठी काही उपाय आणि सावधानता बाळगण्याचा सल्ला डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकारी वेळोवेळी देत आहेत. त्यातच घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे प्रशासनाकडून बांधकारक करण्यात आले आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिक मास्क लावताना दिसत आहेत. त्यातही N-95 मास्क हे सुरक्षित असल्याचे सुरुवातीपासून सांगण्यात आले आहे मात्र आता या मास्कविषयीच सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक राजीव गर्ग यांनी याविषयी महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सर्व राज्यातील स्वस्थ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रा द्वारे हे N-95 मास्क वापरल्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी या पत्रात काही लोक N-95 मास्कचा गैरवापर करत असून मास्कला श्वास घेण्यासाठी छिद्रयुक्त एक यंत्र लावत असल्याचे समोर आले असून हे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत गर्ग यांनी व्यक्त केले आहे. अशा मास्कमुळे बाहेरून येणारे विषाणू रोखले जाऊ शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले.तसेच गर्ग यांनी, सर्व लोकांना आंपल्या मास्कचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी सूचना द्याव्यात असे म्हटले आहे