दिलासा:आता 20 मिनिटात होणार करोना चाचणी
मेलबॉर्न – ऑस्ट्रेलियाच्या मोनॅश विद्यापीठाने 20 मिनिटांत करोना चाचणीचे निष्कर्ष देणारी एक नवीन पद्धत शोधनू काढली आहे. रक्ताच्या चाचणीद्वारे करोनाचे रुग्ण शोधण्याची ही पद्धत आहे. या चाचणीमुळे करोनाचे रुग्ण शोधणे अत्यंत सोपे जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
रक्तातून 23 मायक्रोलिटर प्लाझमाच्या आधारे ही चाचणी करता येणे शक्य आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यातून पेशंट करोना निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह हे 20 मिनिटांमध्ये शोधता येत असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रयोगशाळेत काही साधी उपकरणे लावल्यानंतर दर तासाला दोनशे चाचण्या घेण्यात येऊ शकतात, असेही या संशोधकांचे म्हणणे आहे. यातील हायग्रेड डायग्नोस्टीक मशिन्सच्या आधारे दिवसाला 16 हजार 800 चाचण्याही घेता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
या चाचण्यांचे निष्कर्षही खात्रीशीर आहेत. ज्या देशांमध्ये करोना रूग्णांचे प्रमाण अधिक आहे त्या िंठकाणी ही चाचणी पद्धत अतिशय परिणामकारक सिद्ध होऊ शकते असा या संशोधकांचा विश्वास आहे. सध्याच्या पद्धतीत स्वॅब घेऊन त्याच्या चाचणीचे निकाल येण्यास प्रचंड प्रमाणात विलंब लागतो. त्यातून रूग्ण पॉझिटिव्ह आहे हे कळायच्या आत तो अनेकांच्या संसर्गाला कारणीभूत ठरू शकतो.
या नव्या पद्धतीत रुग्णाची चाचणी जागच्याजागी होत असल्याने त्याच्या संबंधात पुढील निर्णय घेणे शक्य होते व त्याच्यापासून अन्य लोकांना होणारा प्रसारही टाळता येऊ शकतो. या चाचणी पद्धतीचा संपूर्ण जगभर प्रसार व्हावा आणि सरकारांनी त्याला मान्यता द्यावी अशी मागणीही या संशोधकांनी केली आहे.