पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढले; मोदी सरकारचा निर्णय
नवी दिल्ली – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सरकारला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच नवे दर लागू होणार आहेत. यामुळे सरकारकडे १.६ लाख कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, पेट्रोलवर आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क प्रति लिटर १० आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये असणार आहे. यानुसार पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर ८ रुपये रोड सेस आकारण्यात येणार आहे. तर विशेष अतिरिक्त शुल्काच्या स्वरूपात पेट्रोलवर प्रति लिटर २ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ५ रुपये आकारण्यात येतील. मात्र, पेट्रोल पंपावर इंधनाच्या किरकोळ विक्रीवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. यामुळे या उत्पादन शुल्क वाढीचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार नाही.