सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला:50 हजार पार
मुंबई: लग्न सराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी नागरिकांना तब्बल 50 हजार 282 रुपये मोजावे लागणार आहे. यासाठी जीएसटी जवळपास 1500 रुपयांच्या आसपास भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना 10 ग्राम सोन्यासाठी जीएसटी पकडून 51 हजार 782 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरांत आणखी वाढ होऊन ते दसऱ्यापर्यंत 55 ते 56 हजारांच्या आसपास जाऊ शकते अशी शक्यता देखील मुंबई ज्वेलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात येतं आहे.
सोमवारी जीएसटी सोडून सोन्याचा 10 ग्रामसाठी दर 48 हजार 886 रुपये इतका होता. यामध्ये आज जवळपास 1400 रुपयांची वाढ होऊन तो 50 हजार 282 रुपये इतका झालेला आहे. एकंदरीत विचार केला तर आज सोन्याच्या दरात 10 ग्रामसाठी 1400 रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी चांदी देखील 50 हजारांच्या पूढे गेली आहे. आणि आज दुसऱ्याचं दिवशी सोने देखील 50 हजारांच्या पुढे गेले आहे.
ही वाढ होण्यामागे सध्या देशात आलेली कोरोना व्हायरसची महामारी प्रमुख कारण आहे. यामध्ये लाखों लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सोन्याच्या दरात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सध्या देशात सोन्याची आयात कमी प्रमाणात झाली आहे. यासोबतच़ जगभरात सोन्याच्या ज्या खाणी आहेत. तिथं कोरोना व्हायरसचा फटका बसल्यामुळे कामगार कमी आहे. या सर्व बाबींचा परिणाम सोन्याचे दर वाढण्यास कारणीभूत ठरले आहेत.