पुणेमहाराष्ट्र

राज्यात पुन्हा लॉकडाऊन नाही; तर’अनलॉकच’असेल-टोपेंची महत्त्वाची माहिती

पुणे: ‘राज्यात यापुढे पुन्हा ‘ लॉकडाऊन ‘ होणार नाही तर ‘ अनलॉक ‘च असेल’ असे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात दिले. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन अशा ‘एसएमएस’ प्रणालीसोबतच आपल्याला जगावे लागणार आहे, असे टोपे यांनी नमूद केले.
राज्यात चाचण्या होत नाहीत, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून देशाचा विचार केला तर पुण्यात आणि मुंबईत सर्वाधिक चाचण्या होत आहेत. मृत्यूदरही लपवला जात नसून सरकारकडून खरी माहिती जाहीर केली जात असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. जुलै, ऑगस्ट महिन्यांत करोना रुग्णांचा आकडा वाढू शकतो. त्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. मात्र, लॉकडाऊन राहणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. पुणे, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. बैठकीत करोना स्थितीवर सविस्तर चर्चा झाली. पुणे पिंपरीतील स्थितीचाही धावता आढावा घेण्यात आला. साडेतीन ते चार तास ही बैठक चालली. पुण्यातील सर्व खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वाढत असलेली रुग्णसंख्या, उपचार, हॉस्पिटल संख्या, त्यातील बेड संख्या, खासगी हॉस्पिटल लावत असलेले शुल्क याबाबत बैठकीत चर्चा झाली. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. यात लवकर निदान होणे गरजेचे असते. लक्षणे लपवू नका. शंका वाटल्यास लगेच तपासणी करून घ्या, असे आवाहन टोपे यांनी केले. हॉस्पिटलमधील बेडची संख्या पाहता जुलैमध्ये अडचण येणार नाही. त्यातही जर रुग्णसंख्या वाढत राहिली तर तशी व्यवस्था करावी लागेल. रुग्णालयांत ८०-२० टक्के हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र झाली पाहिजे. खासगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली व्यवस्था पाहण्यासाठी तसेच दर आकारणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष अधिकारी असला पाहिजे. त्यासाठी पावले टाकली जात आहेत, असेही टोपे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *