आणखी एक राज्य पुन्हा लॉकडाउनच्या वाटेवर?; मुख्यमंत्र्यांची तज्ज्ञांशी चर्चा सुरू
नवी दिल्ली/वृत्तसेवा
करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पश्चिम बंगाल सरकारनं ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लॉकडाउन लागू करण्याची चिन्ह आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांशी यासंदर्भात चर्चा करत आहेत, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली
कर्नाटकातील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कर्नाटका करोनाचा प्रसार वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. बुधवारी राज्यात ३९७ नवीन करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १० हजार ११८ इतकी झाली आहे. यात १६४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकार लॉकडाउन करण्याची चाचपणी करत आहे. याविषयी बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले,”राज्यात लॉकडाउन लागू करण्याची गरज आहे का व केव्हा गरज पडेल, याबद्दल मुख्यमंत्री येडियुरप्पा हे प्रशासनाती वरिष्ठ अधिकारी व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. पण, अशा प्रकारची पावलं टाकण्याता होणाऱ्या आर्थिक परिणामांचाही आपण विचार केला पाहिजे,” असं बोम्मई म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी २० दिवसांचा लॉकडाउन लागू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर बुधवारी राज्यातील जनतेनं स्वतःहून संचारबंदीचं पालन करावं व घरातच राहण्याचं आवाहन केलं होतं. माणसाच्या आयुष्यापेक्षा अर्थव्यवस्था महत्त्वाची नाही, असं त्यांनी ट्विट करून म्हटलं होतं.
(बातमीमध्ये असलेले छायाचित्रे संग्रहित आहेत)