जिल्हा परिषदेच्या इयत्ता 1 ली ते 10 वी साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया उपलब्ध-अजित कुंभार
बीड दि.24 (प्रतिनिधी) ः बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठीचे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीचा ओढा गेल्या दोन- तीन वर्षांपासून वाढला आहे. भौतिक सुविधासह विविध शैक्षणिक सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमधुन उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे पालकांनी येत्या शैक्षणिक वर्षांत ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध करून दिलेल्या वेबलिंकद्वारे प्रवेश अर्ज भरून घ्यावा. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील एकही बालक प्रेवेशापासून वंचित राहणार नाही यासाठी शिक्षण विभागाच्या सर्व घटकांना सूचना देण्यात आल्या आहेत. विध्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या इयत्ता 1 ली ते 10 वी साठी उपलब्ध करून देण्यात आली असून या प्रवेश प्रक्रियेचा पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अजित कुंभार व शिक्षणाधिकारी(प्रा.)अजय बहिर यांनी केले आहे.
ऑनलाइन प्रेवेश प्रक्रियाअत्यंत सोपी असून पालकाकडील Android Mobile – वरुन घरबसल्या https://zpbeed.gov.in/admission या वेबलिंक वर आपल्या पाल्याचा अर्ज भरून जिल्हा परिषदेच्या शाळेतील आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झालेल्या पाल्यांच्या आवश्यक कागदपत्राची पडताळणी शाळा ज्या वेळेस प्रत्यक्ष सुरु होतील त्या वेळेस करण्यात येईल.
उपरोक्त प्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ऑनलाइन प्रेवेश घेऊ इच्छिणार्या पालकांसाठी दिनांक 25 जून 2020 पासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध होणार आहे .ज्या पालकांना ऑनलाइन प्रेवेश निश्चित करावयाचा आहे परंतु अर्ज भरताना अडचण येत आहे अशा पालकांसाठी वेबसाईट वर तंत्रस्नेही शिक्षकांचे मोबाईल क्रमांक मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
ज्या पालकांना ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे शक्य होणार नाही अशा पालकांसाठी ऑफलाईन पद्धतीने प्रवेश निश्चित करण्यासाठी सुविधा उपलब्ध असून असे पालक शाळेत प्रत्येक्ष भेट देऊन शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडे नियमित प्रवेश घेऊ शकतात. यासाठी सर्व शाळांवर मुख्याध्यापक व शिक्षक शाळेच्या वेळात उपलब्ध असणार आहेत.परंतु ऑफलाइन प्रवेशासाठी शाळेत येत असताना कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर पालक तथा शिक्षक यांनी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील.
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शासन आदेशाप्रमाणे सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधाउपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. भौतिक सुविधेमध्ये शालेय इमारत, क्रीडांगण, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, ग्रंथालय, शैक्षणिक सुविधा मध्ये खीे शाळा,मोफत पाठयपुस्तके, मोफत गणवेश,माध्यन भोजन, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी जादा तासिकेची व्यवस्था, अद्यावत संगणक शाळा,शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आदी सुविधा,विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यामुळे आपल्या पाल्याचा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी केले आहे.