लॉकडाऊन पुन्हा लागू होणार का?मुख्यमंत्री कार्यालायकडून ट्वीट
मुंबई, 12 जून : गर्दी झाल्यास पुन्हा एकदा टाळेबंद करावी लागेल या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लॉकडाऊन पुन्हा लागू होणार का? याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली. तसंच 15 जूनपासून लॉकडाऊन कडक होणार असल्याच्या अफवाही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पसरल्या. मात्र आता या सगळ्याविषयी माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून एक ट्वीट करण्यात आलं आहे. ‘लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या’, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
CMO Maharashtra✔@CMOMaharashtra
लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या.
लॉकडाऊनबाबत काय होती अफवा?
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असून सरकारच्या वतीनं आता अनलॉक 1.0 ही सुरू करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर देशात 15 जूननंतर पूर्ण संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये 15 जूननंतर गृह मंत्रालयाच्या वतीनं अनलॉक़ 1.0 हटवत पुन्हा कडक नियम लागू करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज फेक असल्याचं फॅक्ट चेकमध्ये आढळून आले आहे. पीआयबीनं हा मेसेज फेक असून 15 जूननंतर लॉकडाऊन 6.0 बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. सध्या अनलॉक अंतर्गत हॉटेल, मॉल्स, बससेवा, धार्मिक स्थळांना परवानगी देण्यात आली आहे