पालकमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण
मुंबई-राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.
याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळणं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.