अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीस बुधवारपासून प्रारंभ
अयोध्या – अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. बुधवारी राममंदिराचा पाया रचण्यासाठी पहिल्या विटा रचल्या जातील, असे मंदिर विश्वस्त प्रमुख प्रवक्त्याने सांगितले. याप्रसंगी रामजन्मभूमीवरच्या कुबेर टिळा येथे भगवान शंकराची पूजा केली जाणार आहे. लंकेवर स्वारी करण्यापूर्वी श्रीरामाने जो रुद्राभिषेक केला होता, तीच ही पूजा असणार आहे, असे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दास यांचे प्रवक्ते महंत कमल नयन दास म्हणाले.
या विशेष पूजेनंतर मंदिराचा पाया घालण्याचे काम सुरू होईल. महंत नृत्य गोपाल दास यांनी नुकतीच या ठिकाणी भेट दिली आहे. त्यांच्यावतीने कमल नयन दास आणि अन्य पुजारी ही विशेष पूजा करणार आहेत. हा धार्मिक सोहळा किमान दोन तास चालेल आणि त्यानंतर राम मंदिराचे बांधकाम मंदिराचा पाया रचण्याचे काम सुरू होईल, असे कमल नयन दास यांनी सांगितले.
मार्चमध्ये, राम लल्लाच्या मूर्ती समारंभपूर्वक मंदिरातील कामाच्या ठिकाणावरून नवीन ठिकाणी आणण्यात आल्या आणि मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा करण्यात आला. 11 मार्च रोजी यांत्रिकीकरणाने जमिनीचे सपाटीकरण सुरू करण्यात आले.