शिष्यवृत्ती निकालासाठी आणखी दोन महिने प्रतिक्षा
– लॉकडाऊनमुळे ठप्प होते काम
– शिथिलता आल्याने परत वेग
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची आठवड्याभरात जाहीर होणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल ऑगस्टमध्ये लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शाळा यांना या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालासाठी आणखी दोन महिने वाट पहावी लागणार आहे.
राज्यात सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी 16 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यासाठी 9 लाख 71 हजार 764 विद्यार्थ्यांची नोंदणी शाळांनी केली होती. यात इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 74 हजार 372 तर, आठवीसाठी 3 लाख 97 हजार 392 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची ही प्रसिद्ध झाली होती. त्यावर प्रश्नपत्रिकामधील चुका व उत्तरसूची यावर ऑनलाइन आक्षेप नोंदवले होते. एकूण 2 हजार 500 आक्षेप दाखल झाले. आक्षेपांची संख्या जास्त असली तरी प्रश्नांची संख्या मात्र कमीच होती.
मार्चपासून असलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प होते. आता त्यात शिथिलता आणल्यामुळे कामकाजाला वेग आला आहे. अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेपांची 20 विषय तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याचे कामकाज झुमद्वारे ऑनलाइन सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. उत्तरपत्रिका स्कॅनिंगचे काम करण्याबाबतची पूर्वतयारीही सुरू आहे.
अंतिम उत्तरसूचीही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर अंतरिम निकाल जाहीर होणार आहे. यावर हरकती, सूचना दाखल करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची तपासणी करून अंतिम निकाल, गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाले की जूनमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर होतो. यंदा मात्र, करोनामुळे निकाल प्रक्रियेतील कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे निकाल लांबणीवर पडणार आहे. आता मात्र जलद गतीने टप्प्याटप्प्याने निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे.
– स्मिता गौड, शिष्यवृृत्ती विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद