कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या थकीत रकमेवर बँकांनी व्याज आकारणी करू नये-जिल्हाधिकारी राहुल रेखावर
बीड, दि.5:-(जि.मा.का.)महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या थकीत रकमेवर दिनांक 18 ऑक्टोबर 2019 पासून योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत व्याजाची आकारणी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे,
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत दिनांक 1 एप्रिल 2015 ते दिनांक 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लक्ष रुपये पर्यंत कर्जमुक्तीस पात्र धरण्यात आलेली आहे.
दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत अशा पीक कर्जावरील व्याजाची जबाबदारी शासनाने स्वीकारलेली आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांची खाती निरंक होऊन त्यांना नव्याने शेती कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व्यापारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी त्यांच्या स्तरावर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर 1 ऑक्टोबर 2019 पासून योजनेअंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी करू नये अशा सूचना राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत.
तसेच दिनांक 17 जानेवारी 2020 च्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाच्या शासन निर्णयानुसार कळविण्यात आले आहे, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पीक कर्ज तसेच अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठण, फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्ज खात्यावर दिनांक 1 ऑक्टोबर 2019 पासून या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच व्यापारी बँकांनी व्याजाची आकारणी करण्यात येऊ नये
याबाबत शासन निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका,ग्रामीण बँका व खाजगी बँकांना कळविण्यात आले आहे या योजनेत प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत व्याजाची आकारणी करू नये आणि असे व्याज कोणत्याही बँकांनी किंवा संस्थेने आकारणी किंवा मागणी केल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत.
०००