सोमवारपासून न्यायालयाचे कामकाज सुरु
50 टक्के उपस्थितीत दोन शिफ्टमध्ये होणार काम
पुणे – करोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमुळे बंद असलेले न्यायालयीन कामकाज दि. 8 जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. न्यायालयात गर्दी कमी व्हावी, म्हणून 50 टक्के न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत राज्यातील सर्व न्यायालयांना सूचना दिल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून न्यायालयीन कामकाज बंद होते. फक्त तातडीच्या दाव्यांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. आता सोमवारपासून सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2. 30 ते 5. 30 यावेळेत हे कामकाज चालणार आहे. तर, प्रमुख न्यायाधीश न्यायालयीन कामाच्या वेळा बदलू शकतात, असे आदेशात म्हटले आहे.
न्यायाधीशांनी न्यायालयातील कामकाज करताना 15 पेक्षा जास्त मॅटर बोर्डवर घेऊ नये. पक्षकारांच्या अनुपस्थितीत आदेश देऊ नयेत. एक्सपार्टी ऑर्डर, साक्षीदारांना समन्स बजावताना सध्याची परिस्थिती लक्षात घ्यावी. निकालाच्या सुनावणीच्या टप्प्यात असलेले निकाल आधी देण्यास न्यायाधीश प्राधान्य देऊ शकतात. डेली बोर्डची कॉपी एक दिवस आधी बार असोसिएशनला द्यावी. त्यामुळे कोर्टात होणारी गर्दी कमी होईल. कोर्ट हॉलमध्ये विनाकारण गर्दी होऊ नये यासाठी ज्या केसची सुनावणी आहे, त्यातील वकील आणि पक्षकारांना हॉलमध्ये प्रवेश करू द्यावा. इतरांनी विनाकारण गर्दी करू नये.
संसर्ग टाळण्यासाठी सूचवलेल्या उपाययोजना
– प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करावे.
– सॅनिटायझर, पाणी, साबण याची सुविधा उपलब्ध करावी.
– कोर्ट हॉल स्वच्छ करण्यात यावेत.
– संगणक वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शक्यतो इतरांना संगणक वापरू देऊ नये.
– कोर्ट परिसरात पुढील आदेश येईपर्यंत की-ऑस्क बंद ठेवावेत.
– कोर्टातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी न्यायिक अधिकारी नेमावेत.
– स्वच्छेचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी. राज्यातील न्यायालये सुरू करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.