महाराष्ट्रमुंबई

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंची वर्णी

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये वर्णी लागली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. यात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के असल्याचे म्हटले आहे.

आयएएनएस आणि सी व्होटर्सच्या अहवालानुसार बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. 82.96 टक्के लोकांनी पटानायक यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्‍त केले आहे. त्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर छत्तीसगडमधील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (81.06 टक्के), तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (80.28) यांचा समावेश आहे.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर व्हायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (78.52 टक्के) यांना मिळाला आहे. तर पाचव्या स्थानावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना 76.52 टक्के मते मिळाली आहे.
विशेष म्हणजे या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव असून त्यांची लोकप्रियताही उद्धव ठाकरेंपेक्षा कमी आहे. केजरीवाल यांना 74 टक्के मते आहेत. सर्वाधिक पसंती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या सहामध्ये केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपाशासित राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही.
सर्वात कमी लोकप्रियता असलेले मुख्यमंत्री
सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधील आहे. तळाला असणाऱ्या पाच मुख्यमंत्र्यांपैकी एका राज्यातील सरकार हे भाजपाच्या पाठिंब्यामुळे स्थापन झालेले आहे. सर्वात कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरणायाचे मनोहर लाल खट्टर (4.47 टक्के मते), उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (17.72) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (42.79) या तीन भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. तळाच्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (30.82) आणि कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (27.51) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *